नियमित आत्मिक शुद्धी गरजेची : पुज्य अनिलजी दुलानी

0
134

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण दिवसागणिक वाढता आहे. स्पर्धेच्या या काळात नैराश्य, वैफल्य, राग-द्वेष वाढीस लागले आहेत. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात नवनवीन समस्या उद्भवतात. त्यावर उपाय म्हणजे ध्यान-धारणेच्या माध्यमातून नियमित आत्मिक शुद्धीकरण हे होय, असे प्रतिपादन मुंबईचे पुज्य अनिलजी दुलानी यांनी येथे केले.
अकोला येथे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आले असता त्यांनी आज 11 जुलैला सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी बी. कॉम. नंतर एमबीए करुन मुंबईला आयटी कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. माझेही इतरांप्रमाणेच गलेलठ्ठ पगाराची नोकरी, विदेश यात्रा, कार-बंगला यासारखी स्वप्ने होती. दरम्यान 2003 मध्ये माझे गुरु दीपक पटेल यांच्या प्रेरणेने भारतातच राहून ज्ञानार्जनाचा मार्ग स्विकारला. भारतीय संस्कृती खूप महान असून आजच्या पिढीला त्याविषयी फारशी जाणिव नाही. आपल्या येथील ज्ञान संपादन करुन इतर देशांमध्ये त्याचा लाभ घेतला जात असताना आम्ही मात्र त्यांना फॉलो करतो, हे दुर्देव आहे. दिवसभरात अनेक कारणांनी आपल्या मनात अनेक अनावश्यक गोष्टींचा खच साचतो. आपले मन हे डस्टबिन बनते. त्याची नियमित साफसफाई करण्यासाठी प्रत्येकाने किमान दहा मिनीटे दररोज ध्यान-धारणा करणे गरजेचे आहे. याला धर्माचे व अध्यात्माचे स्वरुप न देता वैज्ञानिक दृष्टीकोनातून आम्ही आजच्या पिढीला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. दररोज बुधवारी रात्री साडेआठ ते दहा दरम्यान आमची झुम मिटींग होवून त्यामध्ये देश-विदेशातील दीडशेवर लोक सहभागी होतात. यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा घडते. ‘एक कदम सत्य कि और’ हा आमचा युवा पिढीसाठीचा अजेंडा असून आमची कुठलाही संस्था, ट्रस्ट, संघटन नाही वा मार्गदर्शनासाठी शुल्क आकारले जात नाही, असेही ते म्हणाले. यावेळी किशोर बाछुका, साक्षी बाछुका, सिम्रन कटारीया आदींची उपस्थिती होती.
पालक नव्हे मित्र बना
अलीकडे लहान मुले अन् युवावर्गात नैराश्य वाढले असून त्यामुळे आत्महत्या, व्यसनाधिनता बळावली आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी त्यांचे मित्र बनून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याला समजावून सांगताना रागावून व दटावून त्याचे शत्रु बनू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Previous articleपोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांची बदली करू नका
Next articleप्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘संवाद दिन’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here