चिचाळा गावात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्या विद्यार्थ्याचा जाहीर सत्कार उत्साहात

0
272

Mul:- चिचाळा गावातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करून अग्निवीर सैन्य भरतीत घवघवीत यश संपादन केलेल्या गावातील होतकरू युवक राकेश गुडलावार यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालय, चिचाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास गावातील युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. राकेश गुडलावार यांनी कठोर परिश्रम, जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर अग्निवीर सैन्य भरतीत उल्लेखनीय यश मिळवून चिचाळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

त्यांच्या या यशामुळे गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. यावेळी राकेश गुडलावार तसेच त्यांच्या आई-वडिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे, ज्ञानेश्वर गुरनुले, मुकेश गांडलेवार, स्वप्नील लेनगुरे, मुकेश गाजेवार, चांदुजी चलाख, बळवंत चलाख, संदेश निमगडे, नगेंद्र चलाख तसेच गावातील मान्यवर नागरिकांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राकेश यांच्या यशाचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षण, मेहनत आणि शिस्त यांच्या बळावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. देशसेवेची संधी मिळणे ही गावासाठी अभिमानाची व गौरवाची बाब असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालय हे गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असून अनेक युवक येथे नियमित अभ्यास करून विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत. राकेश यांच्या यशामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाचा शेवट उपस्थितांनी राकेश गुडलावार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दऊन करण्यात आला.

Previous articleभाजप नेते स्व. अनिलभाऊ साखरकर यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा | भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here