जुनासुर्ला येथे भीषण अपघात : स्लॅब टाकताना विद्युत प्रवाह लागून दोन मजुरांचा मृत्यू गावात शोककळा; सुरक्षा उपाययोजनांबाबत स्थानिकांची मागणी

0
178

मुल (प्रतिनिधी) मुल तालुक्यातील जुनासुर्ला गावात आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास स्लॅब टाकण्याच्या कामादरम्यान घडलेल्या एका भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत मजुरांची नावे हरिदास शशिकांत चुदरी (वय ३७) व विनोद मुकुंदा बोरकुटे (वय ४०) अशी असून, दोघेही नवेगाव भुजला (ता. मुल) येथील रहिवासी होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुनासुर्ला गावात घराचे बांधकाम सुरू असताना लोखंडी रॉड उभारण्याचे काम चालू होते. दरम्यान, उभा करण्यात येत असलेला रॉड वरून गेलेल्या हायटेंशन विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने दोन्ही मजुरांना जोरदार विद्युत प्रवाह बसला. त्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनंतर काही क्षणातच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात तातडीने मुल पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा राष्ट्रपाल काटकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

या दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कर्ते पुरुष अचानक गेले असल्याने नवेगाव भुजला गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने होणारे अपघात पुन्हा एकदा समोर आले आहेत. स्थानिक नागरिकांनी अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा साधने व दक्षता घेण्याची मागणी केली आहे.

Previous articleउपजिल्हा रुग्णालय मुल येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन 
Next articleआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या टपाल तिकीट प्रकाशनाचा मार्ग मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here