मुल (जि. चंद्रपूर) : मुल शहरातील स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुल यांना कायमस्वरूपी (लीज) तत्वावर देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत संस्थेच्या वतीने नगर परिषद, मुल येथील मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर सभागृह हे शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण असून विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी याचा उपयोग केला जातो. बेलदार समाज हा सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपैकी एक असून समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र जागेची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.
संस्थेने अनेक वर्षांपासून समाजहितासाठी विविध उपक्रम राबविले असून, सभागृहाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याची क्षमता संस्थेकडे असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नगरपालिकेच्या नियमांनुसार सदर सभागृह संस्थेला लीजवर देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीमुळे समाजाच्या प्रगतीस चालना मिळून विविध सामाजिक उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





