स्वच्छतेसाठी झटणारा एक असामान्य कामगार — बबलू गेडाम यांचा निस्वार्थ सामाजिक लढा!

0
265

मूल (जि. चंद्रपूर)

कधी कधी समाजात मोठे बदल घडवण्यासाठी मोठ्या पदांची किंवा प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर लागते ती केवळ एक ठाम जाणीव, सेवाभाव आणि कृती. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे मूल शहरातील *बबलू गेडाम* यांची, जे गेल्या *चार वर्षांपासून कुठलीही अपेक्षा न ठेवता, निस्वार्थपणे स्वच्छतेसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या बबलू गेडाम यांचं दैनंदिन आयुष्य फारसे वेगळं नाही — सकाळी काम, संध्याकाळी घरी जाणं. मात्र या दैनंदिनतेतूनच त्यांनी वेळ काढत शहरात एक विधायक बदल घडवण्याचं ठरवलं. *दुकान उघडण्याआधी आणि रात्री काम संपल्यानंतर*, बबलू स्वतः झाडू घेऊन रस्त्यावर उतरतात, कचरा उचलतात, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करतात आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करतात.

समाजासाठीचा प्रवास सुरू झाला 2020 पासून…

साल 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख गौरव शामकुळे या युवकाशी झाली. गौरव दररोज स्वच्छता अभियान चालवत असत आणि त्यांचं काम पाहून बबलू गेडाम प्रचंड प्रेरित झाले. सुरुवातीला मदतीसाठी सामील झालेले बबलू आज आपल्याच पायावर उभं राहून एक आदर्श समाजसेवक म्हणून ओळखले जात आहेत.

गौरव शामकुळे सांगतात —

“स्वार्थी जगात निस्वार्थ सेवा करणारा मित्र मिळाला हे माझं भाग्यच. तो कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता दररोज सकाळी दोन तास समाजासाठी देतो, हे पाहून खरंच अभिमान वाटतो.”

‘सामान्य’ कामगार, पण ‘असामान्य’ कार्यकर्ते

बबलू गेडाम यांच्या कार्यात प्रसिद्धी नाही, गाजावाजा नाही, तरीही त्यांचं सामाजिक योगदान खूप मोठं आहे. त्यांनी कोणतीही मदत, निधी किंवा यंत्रणा मागितलेली नाही. त्यांचा एकच उद्देश —

“आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणं.”

शासनाच्या दखलेची गरज

अशा निस्वार्थ कार्यकर्त्यांची आज समाजाला अत्यंत गरज आहे. शासन व प्रशासनानेही अशा व्यक्तींची दखल घेऊन त्यांना योग्य सन्मान आणि व्यासपीठ मिळवून द्यावं, ही समाजाचीही जबाबदारी आहे. बबलू गेडाम यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून गौरवण्यात यावं, अशी नागरिकांमधून मागणी वाढू लागली आहे.

Previous articleवाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार – सिंदेवाही तालुक्यातील घटना
Next articleआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे खेळाडूंच्या क्रीडांगणाचा मार्ग मोकळा क्रीडांगण कायम राहणार – बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here