मूल:- कांतापेठ गावासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. या गावातील रोहित अरुणा अनिल गंगरेड्डीवार याने अवघ्या २५ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या रोहितने आपल्या जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवून गावाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
रोहितच्या या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडील श्री. अनिल गंगरेड्डीवार हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत. आई श्रीमती अरुणा गंगरेड्डीवार या गृहिणी असून, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे. रोहितचा मोठा भाऊ अंकुश हा इंजिनियर आहे आहे, तर मोठी बहिण अवंती गंगरेड्डीवार-पोटवार या माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
दहावी संपल्यानंतर रोहितने पुण्याच्या दिशेने शिक्षणाचा प्रवास सुरू केला. त्याच्यासाठी पुणे हे केवळ शहर नव्हतं, तर स्वप्नांची आणि संघर्षांची भूमी होती. सुरुवातीपासूनच त्याचं ध्येय ठाम होतं – “माझं यश माझ्या कष्टातून मी घडवणार.” सकाळपासून रात्रीपर्यंत अविरत अभ्यास, त्यावर ट्युशन्स आणि कॉलेज – हा प्रवास सोपा नव्हता. त्याने झोप, सण-उत्सव, वैयक्तिक आयुष्य यांचा त्याग करत फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.
अवघ्या २५ व्या वर्षी CA बनणं ही केवळ डिग्री नाही, तर कठोर परिश्रम, सातत्य, समर्पण आणि आत्मविश्वासाचं मूर्त स्वरूप आहे. अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करणं – हा रोहितच्या यशामागचा खरा मंत्र राहिला आहे.
या आनंददायी बातमीचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ती रोहितच्या कुटुंबाला पंढरपूर वारीच्या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी मिळाली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०० कि.मी.चा पायी प्रवास करत असतानाच त्याला मिळालेलं हे यश – हे केवळ योगायोग नसून, परमेश्वराच्या कृपेची प्रचिती मानली जात आहे.
रोहितचं यश म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ आहे. त्याने हे सिद्ध केलं आहे की, वय लहान असलं तरी स्वप्न मोठी असली पाहिजेत, आणि त्यासाठी मेहनतीची तयारी हवी.
कांतापेठ गावातूनचा पहिला CA म्हणून रोहित गंगरेड्डीवार याच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी संपूर्ण गावकऱ्यांतून आणि शिक्षक समुदायातून भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.





