मूल नगर परिषद कंत्राटी सफाई कामगारांचा अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनमध्ये सामूहिक प्रवेश

0
122

मूल : अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन रजि. नं. २२६१ कामगार संघटना, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नगर परिषद मूल येथील कंत्राटी सफाई कामगारांचा मोठ्या संख्येने सामूहिक प्रवेश सोहळा पार पडला. सदर कार्यक्रम दि. १६/०५/२०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, मूल येथे आयोजित करण्यात आला होता. नगर परिषद मूल येथील कंत्राटी सफाई कामगारांना शासनाच्या धोरणानुसार किमान वेतन कायद्याअंतर्गत दररोज ₹८३० वेतन मिळत नसल्याने तसेच शासकीय सुविधांचा अभाव, वाढती महागाई, कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने सर्व कंत्राटी सफाई कामगारांनी एकत्र येत अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या तालुका शाखा मूलमध्ये प्रवेश घेतला. हा प्रवेश सोहळा तालुका अध्यक्ष संदीप पारचे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला प्रदेश सचिव व विभागीय अध्यक्ष श्री. छगनजी महातो, महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा दलित मित्र श्री. विजयजी मोगरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. सुनील बलिराम महातव, कार्याध्यक्ष श्री. अरविंद बकसरीया तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष महानंदे उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सुनील बलिराम महातव यांनी संघटनेचे कार्य व महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याअंतर्गत योग्य वेतन मिळवून देण्यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करेल. आवश्यकता भासल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबून कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटना ठाम भूमिका घेईल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संदीप पारचे यांनी प्रभावीपणे केले. उपस्थित मान्यवरांनी कंत्राटी सफाई कामगारांना संघटनेचे महत्त्व पटवून देत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कंत्राटी सफाई कामगार श्री. शंकर मोहरले यांची उपाध्यक्षपदी तर श्री. सुशांत आकेवार यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात संघटनात्मक आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कंत्राटी सफाई कामगार उपस्थित होते व कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला.

Previous articleक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले चित्ररथ उद्या दिनांक 15 मे 2026 ला मुल नगरीत होणार दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here