…. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची माहिती
मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या लहान लहान उद्योग एककांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ या प्रक्रियेचे चक्र अकोला जिल्ह्यात गतिमान झाले आहे. अकोला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या २७ उद्योग एककांचे एकत्रिकरण (Cluster) ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या नावाने तयार करण्यात आले असून त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे. बंगलोर येथील एजन्सी मार्फत ‘मॅक्स’ या इंटरनॅशनल ब्रॅंडचे दोन लाख टी शर्टस बनविण्याची ऑर्डर या उद्योगास मिळाली आहे.
कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या अकोला जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया उद्योग होऊन ‘कापूस ते कापड’ येथेच तयार व्हावे, अशी ही संकल्पना. या संकल्पनेला जिल्ह्यात ‘एक गाव एक उत्पादन’, हे रुप देऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी चालना दिली. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कापूस प्रक्रिया करणाऱ्या एककांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या उद्योग समुहाचे एकत्रिकरण करण्यात आले. आता सद्यस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून २७ युनिट कार्यरत आहेत. सुक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी ५० लक्ष रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत.
या उपक्रमाची सुरुवात सम्यक जिनिंग चिखलगाव येथून झाली. या उद्योगाचे चालक कश्यप जगताप यांनी माहिती दिली, की, कापसाचे केवळ जिनिंग प्रेसिंग न करता पुढे धागे व कापड ते थेट वस्त्र तयार करे पर्यंत प्रक्रिया येथेच कराव्यात. यासाठी विविध उद्योजकांना एकत्र केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी त्यास चालना देऊन एकूण ३० जणांना एकत्र आणून त्यांना टेक्सटाईल उद्योगाचे प्रशिक्षण तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्या. त्यातून २७ जणांनी यात सहभाग घेतला. हे सर्व उद्योजक हे अनुसूचित जातीतील आहेत, हे विशेष. अशी माहिती अकोला जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.





