रस्त्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली, एकाचा मृत्यू

0
194

रस्त्यावर अंधारामध्ये उभा करून ठेवलेल्या ट्रकला दुचाकी मागच्या बाजूला धडकली. दुचाकीस्वार ६० वर्षीय विलासराव साहेबराव ठाकरे (रा. मयुर कॉलनी संत तुकाराम चौक अकोला) यांचा नाहक बळी गेला. ही घटना अकोला – दर्यापूररोडवर घुसरनजीक वाघोबा धाब्याजवळ मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजताच्या सुमारास घडली. मृत्यूस कारण ठरलेल्या ट्रकचालकाविरुद्ध मृतकाचे भाऊ महेंद्र साहेबराव ठाकरे यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विलासराव साहेबराव ठाकरे हे बाभुळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांची म्हैसांग येथे शेती असल्याने त्यांचे नेहमी येणे-जाणे असते. 1 मार्च रोजी विलासराव ठाकरे हे शेतात हरभरा साेंगणी असल्याने सकाळीच साडेआठ वाजता घरून एमएच 30 टी 4418 क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास घरी येत असताना घुसर रोडवरील वाघोबा ढाब्याजवळ रस्त्यावर एमएच 40 बीजी 6471 क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकला ठाकरे यांची दुचाकी मागच्या बाजूने धडकली. त्यात ठाकरे खाली पडले व त्यांच्या अंगावर दुचाकी पडली. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून रस्त्याने जाणारे शेलू बाजार येथील पवन गजानन आगडे यांनी ठाकरे यांच्या मोबाइलवरून फोन केला. तो फोन त्यांची पुतणी रश्मीने उचलला असता, अपघातात ठाकरे पडले आहेत अशी माहिती तिला दिली. त्यावरून लगेच भाऊ आणि त्यांचा पुतण्या शुभम विलासराव ठाकरे भाचा प्रफुल्ल जगदेवराव टिकार असे तिघे जण घटनास्थळी पोहचले. त्यानंतर विलासराव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Previous article10 मार्चपर्यंत विविध योजनांसाठी अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले
Next articleभाजपा विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here