व-हाड दूत न्यूज नेटवर्क
मुर्तिजापूर: विनयभंग प्रकरणातील आरोपीस न्यायालायाने दोषी आढळल्याने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल विशेष जिल्हा न्यायाधिश व्ही.डी.पिंपळकर यांनी सोमवारी दिला.
प्राप्त माहितीनुसार असे की, मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी संदीप अरुण खंडारे रा. लखपुरी याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी 19 फेब्रुवारी 2016 रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या मुलीस आरोपीने खाऊच्या बहाण्याने घरातून उचलून नेले होते. याप्रकरणात सरकारतर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवल्यानंतर भा. द.वी. कलम 354 ब मध्ये 7 वर्ष सक्त मजुरी 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद व पोक्सो कायदा कलम 7-8 मध्ये 5 वर्ष सक्त मजुरी 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीस सोबतच भोगावयाच्या आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रतापसिंह सोळंके यांनी केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल संजय भरसाकळे व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहाय्य केले. या प्रकरणात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रभुदास ढोरे हा फितूर झाला. त्यामुळे त्याच्यावर भादवी कलम 191 नुसार खोटी साक्ष दिल्या मुळे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





