जिल्हा प्रशासनाने मानले दिपकभाऊ सदाफळेंचे आभार
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: आपल्या सत्कार्याने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन शोध व बचाव पथक नेहमीच चर्चेत राहिले आहे. पुन्हा एकदा या पथकाने आपली कार्यतप्तपरता सिद्ध करीत अकोला जिल्हयातील मुर्तीजापुर तालुक्यातील पोही गावातील एका गर्भवती महीलेला गुरुवारी मध्यरात्री पूराच्या पाण्यातून बाहेर काढत सहीसलामत पोहचवण्यात यश मिळवले आहे. यासाठी सर्व स्तरातून मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर चे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह पथकाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
मागील दोन दिवसापासून अकोला जिल्हयात सर्वत्र पाऊस आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. गुरुवारी मुर्तिजापूर तालुक्यातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे मुर्तिजापूर तालुक्यातील पोही गावातुन मुर्तीजापुरला येणा-या हीवरा कोरडे मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. संध्याकाळी साडेसात वाजता अकोला जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे व मुर्तिजापूरचे एसडीआे अभयसिंह मोहिते पाटील यांचा मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर चे प्रमुख दीपक सदाफळे यांना फोन आला. पोही गावच्या एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवायचे आहे. तापाकळी नदीला आणी पोही ते माना मार्गावरील उमानदीला पुर असल्याने दोन्ही मार्गावरील पुलावरुन पाच फुट पुराचे पाणी असल्याने आपल्या पथकाच्या मदतीची गरज आहे. क्षणाचाही विचार न करता दिपक भाऊ सदाफळे यांनी मदतीसाठी होकार दर्शवला.
अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे सर यांच्या आदेशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे तलाठी, सुनिल कल्ले,तलाठी हरीहर निमकंडे, आणी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर चे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकातील रेस्क्यु ऑपरेशन वाहनासह पथकाचे सदस्य ज्ञानेश्वर म्हसाये,शरद महल्ले, अंकुश सदाफळे,मयुर सळेदार,सागर आटेकर, धिरज राऊत,सुरज ठाकुर,महेश साबळे, महेश वानखडे, हे रेस्क्यु साहीत्यासह गावाकडे रवाना झाले. रात्री आठ ते पावणेबारा वाजेपर्यंत हे मदत कार्य चालले. त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढत मुर्तिजापूर येथील डॉ. मंडलापुरे यांच्या दवाखान्यात भरती केले. या सर्व मोहिमेदरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे , उपविभागिय अधिकारी अभयसिंह मोहीते तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, पोहीचे सरपंच कीशोर नाईक हे संपर्कात होते. जिल्हा प्रशासनासह पोही येथील नागरिकांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर चे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह पथकाच्या कार्याची प्रशंसा करीत आभार मानले.





