मेनोपाॅज म्हणजे मासिकपाळी बंद होण्याच्या काळात होणाऱ्या लक्षणाबद्दल लिहिले होते.. आता त्या परिस्थितीत होणारे दुष्परिणाम माझ्या पाहण्यातले मांडतेय.. तर ती जी अस्वस्थ करणारी हार्मोनल लक्षणे असतात त्यांच्या मुळे महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.. मग ती सुशिक्षित स्त्री असो की अशिक्षित.. पण सुशिक्षित किंवा शहरातील स्त्री असेल तर ती आपल्या शरीरातील बदल ओळखून डाॅक्टर कडे जाते..तिला काही कळले नसले तरी योग्य तो औषधोपचार घेऊन स्वतः ला त्या अवस्थेतून बाहेर आणते.. याला तुमच्या घरचे आणि भोवतालचे वातावरण खूप कामात येते.. कधी कधी जास्तच धार्मिक घराणे असले तर त्याचा अत्यंत त्रास देखील होतो.. कोणी तुम्हाला समजून घ्यायला तयार नसतात.. उगाच नाटकं करते ही काम चुकविण्यासाठी असंही बोलतात.. यात घरातील दुसऱ्या स्त्रिया देखील मागे राहत नाही.. काही ना काही दुखणं बाहेर येतेच या अवस्थेत प्रत्येक स्त्रीला हे मात्र नक्की.
या उलट गाव खेड्यातील महिला बरेचदा डॉक्टर कडे जात नाहीत किंवा गेल्या तरी त्यांचा त्यावर विश्वास कमी असतो.. याला कारण त्यांच्या भवताल ची परिस्थिती.. गावात राहत असल्याने शिक्षणाची कमी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे या सगळ्या लक्षणांचा अर्थ त्या करणी,चेटूक, भूतबाधा वगैरे गोष्टींसोबत जोडून अंधश्रद्धेला बळी पडतात.. खेड्यात काहीही घडले तरी त्याचा संबंध आधी जादूटोण्यासोबत जोडल्या जातो.. या बदलामुळे स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.. मग तो अस्वस्थपणा, ती तगमग संपत नाही म्हणून तिला करणीची जोड दिल्या जाते..
त्यात भर घालणाऱ्या देखील महिलाच असतात शेताशिवारात काम करताना त्यांच्या या गोष्टी चाललेल्या असतात.. मग एकमेकींची उदाहरणे देऊन गोष्टी रंगविल्या जातात.. एखादी बाई मग दुसऱ्या एखाद्या महिलेचे नाव घेते जिच्यावर तिचा आकस,असूया असते.. ही गोष्ट त्या पहिल्या महिलेला पटली नाही तरी तिच्या डोक्यात शंका घर करतेच.. मग हळूच तिलाही ते बरोबर आहे असे वाटते.. तिला मग नको त्या गोष्टी आठवून या बाबतीत योग्य वाटतात.. या सगळ्यात गावातीलच एखादी होतकरू महिला मग नाहक पडी पडते.. होऊ शकते ती कुठल्या बाबतीत यांच्या पेक्षा वरचढ असेल किंवा जुनं एखादे वैर असेल तिलाच मग टारगेट बनविल्या जाते..
मग सुरू होतो एक प्रवास चांगल्यातून वाईटाचा.. कोणीतरी मग कुठल्यातरी भोंदू बुवाचे नाव सुचवतात तिथं फायदा होतो म्हणून.. ही सवारी मग त्या भोंदूबाबाच्या दरबारी हजेरी लावते.. तो बाबा शोधतच असतो असे भोळे बकरे आपल्या फायद्यासाठी.. मग तो आतल्या गोटातून माहिती घेऊन त्याच किंवा आणखी कोणत्या बाई,बुवाने तुझ्यावर करणी केली हे तिला पटवून देतो.. अशाप्रकारे हिच्या मनात हे पक्के बसवल्या जाते की ही सगळी शारीरिक मानसिक अस्वस्थता ही करणी केल्यामुळे आहे.. या बहाण्याने तो भोंदू बुवा मात्र बक्कळ पैसा कमवतो वेळ पडल्यास कोंबडे बकरे ही खातो..
इकडे गावात ती पिडीत महिला दुसऱ्या एका महिलेला जबाबदार ठरवून तिच्या नावे कुजबुज सुरु करते.. गोष्टी गावभर पसरून तिची, तिच्या कुटुंबाची बदनामी केल्या जाते.. नुसती इतकीच गोष्ट न राहता पुढे त्या स्त्रिला, कुटुंबाला मारहाण देखील केल्या जाते.. याहून पुढे कुठे त्यांना काळे फासणे,धिंड काढणे असेही प्रकार घडतात पण मुख्य मुद्दा,बिमारी बाजूलाच राहते.. काही वेळेला मग ही बाब पोलिस स्टेशन किंवा गावातील पोलिस पाटलांपर्यत पोहचते.. त्यातले कोणी सुज्ञ असले तर किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोणी कार्यकर्ते असलेच गावात तर मग अशा घटना उघडकीस येतात..
इथे मग पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना खूप महत्वाची भूमिका बजावी लागते.. पिडीत महिलेला, बळी महिलेला, गावातील लोकांना समजावून सांगणे आणि असं केल्यास कायदेशीर कारवाई होते हे पटवून द्यावे लागते.. अशाप्रकारे या हार्मोनल बदलांमुळे महिलांना खूप वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.. स्त्रिच्या शारीरिक लक्षणांमुळे बरेचदा शारीरिक सबंधात पण अडचण येऊ शकते त्याचे रूपांतर मग नवरा बायकोत होणाऱ्या कुरबुरी ते कौटुंबिक वाद इथपर्यंत होते.. यामुळे पुरूषांच्या बाबतीत विवाहबाह्य संबंध येणे असलेही प्रकार घडतात..
या सर्व गोष्टी टाळता याव्यात म्हणून महिला, पुरुष दोघांमधेही जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.. अस्वस्थ करणारा हा काळ पती,मुले,मुली यांनी समजून घ्यावा.. तिला बरं वाटेल,आराम होईल म्हणून थोडी मदत करणे.. व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त करणे.. शक्य असल्यास फिरायला नेणे किंवा घरीच तिच्याशी चर्चा करणे.. मग ती तिच्या विषयी असो की समाजातील कोणत्याही प्रकारची.. तिला बोलतं करणे, तिच्या मनातील भावना मोकळ्या होणे जरुरी आहे.. तिला जाणीव असतेच या परिपक्वतेची पण बरेचदा ती गृहीत धरायला आपण तयार नसतो..
स्त्रिच्या या वयात मुले मोठी होऊन आपल्या आपल्या विश्वात रममाण झालेली असतात.. नवऱ्याचे एक वेगळेच विश्व असते.. घरातील स्त्री मात्र खूप दूर असते या बाबतीत.. लग्नं,घर,संसार,मुले, नातेवाईक या गोंधळात ती जिवाभावाचे मैत्र जोडणे विसरून जाते.. आणि मग अशावेळी हा एकटेपणा बाहेर डोकं काढून आपल्याला हलवून टाकतो.. महिलांनी स्वतः साठी वेळ काढणे, आपले मैत्र जपणे, घरातून बाहेर पडून निसर्ग जवळ करणे आवश्यक आहे.. हे सर्व इथे लिहिणे सोपे आहे पण प्रत्यक्षात तसं घडत नाही.. अगदी माझ्या बाबतीत देखील!!
आपल्या समाज व्यवस्थेत आम्हा महिलांची रचनाच अशी केली गेलीय की घर, नवरा,मुले हेच त्यांचे जग.. स्वतःचा विचार करणे म्हणजे पाप म्हणून मग या गोष्टी मनावर ठसल्या असल्याने ती स्वतःचा स्वतंत्र असा विचार करू शकत नाही.. दुखणं खुपणं विसरून काम करत राहणे हेच तिला येते किंवा स्वतः आजारी असतानाही तिला मी जगेल की नाही हे सोडून घरचे काय खातील हा विचार आधी येतो.. नवऱ्याचे कसे होईल आणि पोरांचे काय हिच चिंता असते.. स्त्री, महिलांनी यातून बाहेर पडायला हवं आणि यासाठी पुरूषांनी त्यांना मदत करायला हवी.. शेवटी काय तर आपला आपला जोडीदार जपा ती आपलीच गरज आहे आणखी कोणाची नाही!!
(कल्पना सुर्यवंशी गेडाम) ब्रम्हपुरी
टीप: हे सरसकट सर्व महिलांना लागू नसले तरी या वयात प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या बदलांना समोर जावे लागते आणि खेड्यात या गोष्टी अंधश्रद्धेला बढावा देतात हा माझा अनुभव आहे..





