चंद्रपूर, दि.२६ – जिल्ह्यातील युवक-युवतींना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. बल्लारपूर येथे १ मेपासून सुरू झालेल्या उन्हाळी शिबिरात एकूण १५ खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, समाजभान आणि मूल्यसंस्कारांची जोड देणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत.हा ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवणारा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शिबिराच्या समारोप समारंभात केले.
हे शिबिर स्वर्गीय डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत आंबेकर अध्यक्ष, सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर, समीर केने, काशी सिंग, मुन्ना ठाकूर, राजू दारी, संदीप पुणे, सुनील यादव, प्रशांत झांबरे, रोहित तुक्कर आदिंची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथे युवकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमधील वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट, बल्लारपूरमधील कॉलरी गेट मैदान, वन अकादमी आणि सैनिकी शाळेतील सुविधा हे प्रेरणादायी ठरत आहेत.स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने म्हाडामध्ये उभारले जात असलेले २५ खेळप्रकारांचे अत्याधुनिक स्टेडियम ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल ठरेल, असा विश्वासही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
विसापूर क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेला देशभरातील २८ राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.समर कॅम्पच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आ. मुनगंटीवार यावेळी अभिनंदन केले.
महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास उपक्रम
गरजू मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठ व स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमधून अनेक मुलींना स्वबळावर उभं राहण्याची संधी मिळत आहे.विसापूर येथे ‘आर्चरी सेंटर’ सुरू करण्याचे नियोजन असून, युवक-युवतींनी या क्रीडा व प्रशिक्षण सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केले.