चंद्रपूर, दि. 27: बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर या तालुक्यांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत. सातत्याने होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, लघुउद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.*
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महावितरण विभागाच्या तक्रारीसंदर्भात नियोजन भवन सभागृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजभे, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, भाजपा महीला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,भाजपा महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे,सुरज पेद्दूलवार,नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महावितरण विभागात कर्मचाऱ्यांची उपलब्धता, मेंटेनन्ससाठी अपूरा निधी आणि कर्मचारी टेलिफोनवरही उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. वादळ व जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास अनेक वेळा तीन-तीन दिवस वीज परत येत नाही. चंद्रपूर हा राज्यातील प्रमुख वीज उत्पादन करणारा जिल्हा असतानाही येथील नागरिकांना अंधारात राहावे लागते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. महावितरणाने सोमनाथ रस्त्यावर कवर कंडक्टर लावण्याची कार्यवाही करावी. जंगल परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास, वन विभागाशी समन्वय साधून झाडाच्या फांद्यांची छटाई करावी आणि विद्युत तार तुटल्या असल्यास त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
पोंभुर्णा हा मागास तालुका असल्यामुळे महावितरणने विशेष बाब म्हणून फिडर मंजूर करून घ्यावी. यासाठी विशेष बाब अंतर्गत प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर करावा, जेणेकरून आवश्यक मंजुरी मिळवून देता येईल. विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत आणि नवीन डीसी कार्यालय स्थापित करण्याची कार्यवाही करावी. बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळांची उपलब्धता करावी. शेतकऱ्यांच्या शेतात पडलेले खांब तातडीने उचलावेत यासाठी आवाहन करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.
मुल तालुक्यात नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र एफडीसीएम विभागाने अद्याप जागा हस्तांतरित केलेली नसल्यामुळे प्रकल्प प्रलंबित आहे. याबाबत तातडीने पाठपुरावा करण्याची सूचनाही आमदार श्री. मुनगंटीवार यांनी केली.
बल्लारपूर पेपर मिल परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, त्यामुळे तेथे अंडरग्राउंड लाईन टाकणे आवश्यक आहे. यासाठी महावितरणने 22 कोटींचा प्रस्ताव तयार करून डिस्कॉमकडे मंजुरीसाठी पाठवावा. तसेच बल्लारपुर येथे ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी महावितरणचे ब्रांच ऑफिस उभारण्यासाठी कार्यवाही करावी. बल्लारपूर शहरामध्ये महावितरणची वीज बील वसुली 95 टक्के असून, ही बाब डिस्कॉमसाठी आर्थिक दृष्ट्या स्थैर्य देणारी आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या व सुसज्ज सुविधा देण्यासाठी महावितरणने मेंटेनन्ससाठी येणाऱ्या निधीचा योग्य वापर करावा व त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा.
दुर्गापूर येथील सबस्टेशन ताडाळी येथे स्थलांतरित करण्यात आले ते पूर्ववत करण्यात यावे. तसेच दुर्गापुरला ग्राहकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने स्वतंत्र कॉल सेंटरची उभारणी करावी.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मंजूर मनुष्यबळ व रिक्त पदांच्या अनुषंगाने डिस्कॉमसोबत सविस्तर बैठक घेण्यात यावी. तसेच महावितरणच्या तांत्रिक सुधारणांसाठी आवश्यक प्रस्ताव घेणे आवश्यक आहे. उत्तम कार्यालयीन व्यवस्था, दूरध्वनी सेवा, कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वाहने, विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारी शिडी यांसारख्या भौतिक सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात. ग्राहकांची संख्या व ग्राहकांचे प्रकार यांची अचूक माहिती गोळा करावी. मोबाईलवरून तक्रार नोंदवता यावी यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करणे गरजेचे आहे. “वंदे मातरम” व “हॅलो चांदा” या संकल्पनेच्या धर्तीवर महावितरणचे तक्रार निवारण अॅप कार्यान्वित करण्यात यावे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना तक्रार नोंदविण्यास सुलभता व्हावी यासाठी महावितरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे नाव व मोबाईल क्रमांक असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात यावा, असे सक्त निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.