चंद्रपूर, दि. २७ : घरकूल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेतीपुरवठा करणाऱ्या योजनेची अंतिम मुदत १० जून २०२५ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, मे महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नद्या व नाल्यांमध्ये पाणी साचल्याने रेती वाहतुकीचे रस्ते बंद झाले आणि रेती उपसा करण्यात अडथळे निर्माण झाले. परिणामी अनेक घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर, या योजनेची मुदत वाढवून ती ३० जून २०२५ पर्यंत करावी, अशी मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने ८ एप्रिल २०२५ रोजी घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला होता.या मोफत रेती पुरवठ्याची अंतिम मुदत १० जून २०२५ पर्यंत आहे. मात्र, सततच्या झालेल्या पावसामुळे प्रत्यक्षात रेती उपसा थांबल्याने योजनेचा अपेक्षित लाभ अनेकांना मिळू शकणार नाही.
ही अडचण अधोरेखित करत आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री आणि प्रधान सचिव (महसूल व वन विभाग) यांच्याकडे पत्राद्वारे मुदतवाढीची विनंती केली आहे.
३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढीमुळे लाभार्थ्यांना अपूर्ण राहिलेले घरकुल बांधकाम पूर्ण करण्याची संधी मिळेल. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.