फायर लाईन व बांबू बंडल कटाईचे मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजुरांमध्ये संताप; आंदोलनाचा इशारा

0
189

चिंचपल्ली . २३ जून २०२५. केळझर व तुकूम (सातारा) परिसरातील मजुरांनी केलेल्या वनविभागाच्या फायर लाईन व बांबू बंडल कटाईच्या कामाचे पैसे अद्याप न मिळाल्यामुळे स्थानिक मजुरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मजुरी न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, पाच दिवसांत पैसे न मिळाल्यास कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा मजुरांनी दिला आहे.

या संदर्भात केळझर गावचे वनहक्क समिती अध्यक्ष साईनाथ दशरथ लोनबले यांनी एक निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून ११ दिवस फायर लाईनचे काम सुरू करण्यात आले होते. या कामात दर व्यक्तीने सरासरी ५ ते ६ हजार रुपयांचे श्रमदान केले. मात्र, अद्यापपर्यंत मजुरी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे जलाईचे देखील काम करण्यात आले होते, त्याचेही पैसे थकित आहेत.

तसेच, मार्च महिन्यात तुकूम (सातारा) बिट क्रमांक ४३६ मधून झालेल्या बांबू बंडल कटाईच्या कामात २० ते २५ मजूर महिलांसह सामील होत्या. या सर्वांनी परिश्रमपूर्वक काम पूर्ण केले, परंतु त्याचे पैसे आजतागायत देण्यात आलेले नाहीत.

“आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लहान मुले, वृद्ध, महिला यांचं पोट भरण्यासाठी आम्ही हे काम केले. पण अनेक महिने उलटून गेले तरी मजुरी मिळालेली नाही. प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाही, तर आम्ही कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू,” असा इशारा लोनबले यांनी दिला.

स्थानिक प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित

या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित वनविभागाने अथवा स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मजुरांच्या मागण्या रास्त असून त्यांचे श्रमाचे योग्य मोबदले देणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनीही नमूद केले आहे.

Previous articleआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरूवात
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here