वरोरा शिवसेना शिंदे गट च्या वतीने मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना वरोरा नगर परिषदेमधील विविध प्रलंबित समस्या, प्रशासनाचा निष्क्रिय कारभार व संभाव्य आर्थिक गैरव्यवहार याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका वादग्रस्त कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी सदर कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी सहा हजार रुपये घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. शिवसेना शिंदे गटचे आम्ही दोन नगरसेवक विरोधी पक्षात असून, विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी रक्कम घेतल्याचे आम्हालाही समजले. मात्र, वादग्रस्त कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्याबाबत आमच्या नगरसेवकांनी कोणतीही तडजोड केलेली नाही तसेच कोणत्याही प्रकारची रक्कम स्वीकारलेली नाही.
या विधानसभा क्षेत्राचे आमदार करणदेवतळे यांनी सदर कंत्राटदारास काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी विधानसभा सभागृहात केली होती. असे असतानाही नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी पक्षाने संबंधित कंपनीचे देयक अदा करण्याचे धाडस दाखविले आहे. विरोधी पक्षाला आपली भूमिका प्रभावीपणे मांडता येत नसेल तर त्यांनी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावे. शिवसेना शिंदे गटचे नगरसेवक कोणतीही तडजोड न करता जनहितासाठी विरोधी पक्षाची भूमिका शेवटपर्यंत सक्षमपणे पार पाडतील.
निविदा प्रक्रियेत गैरव्यवहाराची शक्यता
वरोरा नगर परिषदेमार्फत जाजू हॉस्पिटल ते रेल्वे स्टेशन मार्गावर सजावटी विद्युत खांब उभारण्याची निविदा काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक महिने लोटले असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शासनाचा निधी परत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय स्वच्छता विभागातील अनेक निविदा पूर्ण होऊनही त्या उघडण्याच्या प्रक्रियेत अनावश्यक विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागातील अनेक निविदा प्रक्रियादेखील प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी नमो उद्यान योजना शासन निर्णयानुसार जून महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या बेजबाबदार व निष्क्रिय भूमिकेमुळे अद्याप कामाचा आदेशही देण्यात आलेला नाही. परिणामी संबंधित निधी परत गेल्यास त्यास पूर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील.
तसेच मुख्याधिकारी व प्रशासनाकडून नगरसेवकांचे दूरध्वनी स्वीकारले जात नसून जनतेच्या कामांना योग्य प्रतिसाद दिला जात नाही. या सर्व बाबींची तक्रार शिवसेना नेते मुकेशजीवतोडे यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक खेमराज कुरेकर कृणाल रुयारकर माजी नगरसेवक राजेश महाजन दिनेश यादव संदीप मेश्राम.





