मूल (प्रतिनिधी): राज्याचे माजी वनमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस नंदूभाऊ मित्र परिवार तर्फे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्यासाठी स्वरगंध भजन मंडळ तर्फे सिद्धिविनायक मंदिरात भक्तिगीतांचे सादरीकरण व महाआरती करण्यात आली. भजनानंतर भाऊंच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा सुभाष नगर, सुभाष उच्च प्राथमिक शाळा आणि गांधी चौक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना बिस्किटे आणि नोटबुकचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अंध व अपंग विद्यालयात देखील नोटबुक, बिस्किटे व अन्नदान करण्यात आले. गांधी चौक येथे सुधीर भाऊंच्या जीवनकार्यावर आधारित सांगीतिक ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले, यावेळी उपस्थितांसाठी मसालाभाताचे वाटप करण्यात आले.
भाजपचा लेबल असलेला केक कापून भाऊंच्या जन्मदिनाला अनोखे रूप देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे रुग्णांना फळवाटप तसेच लहान बालकांसाठी मच्छरदाण्यांचे वाटप करून या दिनाचे औचित्य साधण्यात आले.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरूनुले, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर भोयर, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, राकेश ठाकरे, प्रशांत बोबाटे, सुरज मांदाळे व सुधीर भोयर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.





