60 गावांची पाणीटंचाईपासून कायम मुक्तता होणार

0
205

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

60 गावांची पाणीटंचाईपासून कायम मुक्तता होणार
आमदार रणधीर सावरकर यांची माहिती
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्टयातील खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत असलेल्या 60 गावांची पाणी टंचाई पासून कायम मुक्तता होणार आहे. यासाठी योजना पुनरुज्जीवीत करण्याचे प्रस्तावास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील परंपरागत पाण्याचे दुर्भिक्ष सर्वश्रुत असून या भागातील ग्रामस्थांना सतत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी केंद्र शासनाचा 50 टक्के तर राज्य शासनाचा 50 टक्के निधीचा वाटा असून खारपान पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जलजीवन मिशन या कार्यक्रमात या योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा या साठी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांनी केंद्र शासनाकडे मागणी केली होती. खांबोरा 60 गावे प्रादेशिक ग्रामिण पाणी पुरवठा योजनेंतर्गत 60 गावांना काटेपूर्णा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या ग्रामीण पुरवठा योजनेंतर्गत अकोला पूर्व मतदार संघातील 42 गावे तर बाळापुर विधानसभा मतदारसंघातील 18 गावांचा समावेश आहे. जलदुर्भिक्षाच्या काळात या योजनेच्या शेवटच्या भागातील गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ही योजना जुनी झाल्याने पाणी वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे, हे लक्षात घेऊन सदर योजनेच्या नूतनीकरणाची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी तत्कालीन शासनाकडे केली होती. सदर नुतनीकरण प्रस्ताव मंजुरीसाठी ते सतत प्रयत्नशील होते. या योजनेंतर्गत दोन्ही मतदार संघातील गावांचा समावेश असल्याने आमदार रणधीर सावरकर तसेच आमदार नितीन देशमुख या आमदारांनी मंजुरीसाठी प्रयत्न केले.

Previous articleअल्पवयीन मुलावर प्रेम करणा-या महिलेविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल
Next articleपारंपारिक प्रथेला फाटा देत मुलींनी वडिलांना दिला मुखाग्नी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here