” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी “…

0
218

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी “…
सुरेश भटांच्या उपरोक्त ओळी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्पुल्लिंग चेतवतात. मराठी ही इंडो-युरोपियन भाषाकुलातील सर्वात जुनी भाषा म्हणून ओळखली जाते. बोली आणि लिपी या दोन्हीतील अनेक बारकावे आपल्यात समाविष्ट करून घेणारी मराठी ही एक समृद्ध भाषा आहे.व-हाडी, खानदेशी, अहिराणी, मालवणी या प्रांतिक बोलींबरोबरच ,कोल्हापूरची रांगडी मराठी, कन्नडच्या प्रभावामुळे हेल काढून बोलली जाणारी बेळगावी, मराठी प्रमाण मानली जाणारी पुणेरी मराठी अशा कोसा दर कोसावर बदलणाऱ्या भाषेने आपल्या मराठीला समृद्ध करण्यात मोलाचे योगदान दिले आहे आणि आपल्या माय मराठीनेही तिची ही सारी लेकरं सारख्याच मायेने गोंजारली, पोटाशी धरली.
मराठी भाषेला समृद्ध करण्यात अनेक संत , साहित्यिक आणि कलाकार यांनी मोलाचा वाटा उचलला. ही परंपरा एवढी प्राचीन आहे की दुर्गा भागवतांनी ‘गुणाढ्य’ लिखित ‘बृहत्कथेची’ तूलना रामायण-महाभारताशी केली आहे. तर श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हा मराठीतील पहिला ज्ञात शिलालेख मानला जातो. ” माझ्या मराठीचा बोलू कवतिके। अमृतातेही पैजा जिंके ।।” असे म्हणत संत ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृत भाषेचा दर्जा दिला .नामदेवांच्या ओव्यातून मराठी रूजली . एकनाथांच्या भारूडातून प्रबोधक बनली.
तुकारामांच्या गाथेतील अभंगातून मराठी सर्वश्रुत झाली. वासुदेवांच्या ओव्यांतून दारादारात पोहोचली .तुकाराम , गाडगेबाबा, तुकडोजी यांच्या अभंग आणि कीर्तनातून ती जनमनात विराजमान झाली. रामदासांच्या मनाच्या श्लोकातून तिने संस्कार दिले तर कधी बहिणाबाईंच्या ओव्यामधून स्त्रीमनाचे गूज उलगडले.
महाराष्ट्रातील विविध संतांनी वाणीतून आणि लेखनातून समाजप्रबोधन करण्यासाठी मराठीलाच प्राधान्य दिले . जाती धर्म आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तिने सर्वांना सामावून घेतले. म्हणूनच ‘मराठी भाषेचे प्रशस्ती’ लिहीतांना ‘फादर स्टीफन्स’ म्हणतात,
” पाखियांमध्ये मयोरू। ब्रुखियांमध्ये कल्पतरू।।
भाषांमध्ये मानुव थोरू । मराठीयेसी ।। ”
अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला उजागर केले. लावणी, तमाशा, पोवाडे, लोकगीते यांमधून ती अधिक जवळची वाटत गेली. नाटक ,वृत्तपत्रे, चित्रपट तसेच इतर प्रसारमाध्यमांमधून ती घराघरात पोहोचली.अनेक साहित्यिकांना एकत्र सांधून भाषा विकास व विचारमंथन करणाऱ्या साहित्य संमेलनांनी मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचली.दलित साहित्यातून शोषितांची व्यथा समाजासमोर आली. काही मराठी साहित्यिक तर ज्ञानपीठ सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी ठरले .एकंदरीतच शीलालेखापासून ते ज्ञानपीठापर्यंतचा मराठी भाषेचा हा यशस्वी प्रवास तसेच मराठी भाषेच्या साहित्य आणि संस्कृतीची उंचावर फडकणारी पताका बघून कुठल्याही मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येईल.
मराठी भाषेच्या या यशस्वी वाटचाली मुळेच अनेक भाषिक आक्रमणानंतरही ती तग धरून उभी आहे. पण नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या अहवालानुसार प्रत्येक दोन आठवड्याला एका भाषेचा मृत्यू ओढावत आहे. अशा या परिस्थितीत आपली माय मराठी टिकवायची असेल तर तिचा स्वीकार आणि यथोचित वापर महत्त्वाचा ठरतो. १९६६ सालापासून राजभाषा मराठीचा शासकीय कामकाजात वापर अनिवार्य झाला . परंतु तिची स्थिती पाहून कविवर्य कुसुमाग्रज म्हणाले,” डोक्यावर सोनेरी मुकुट , पण अंगात फाटके कपडे, अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.” एकंदरीत मराठीच्या वापराबाबत लोकांमध्ये असलेले नैराश्य आणि वेगाने फोफावणारी कॉन्व्हेंट संस्कृती यामुळे मराठीच्या अस्तित्वावरच घाव घातला जात आहे.”माय मरो, पण मावशी जगो” अशी म्हण आपल्याकडे प्रचलित असली तरी, मायची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही , हे वेगळे सांगायची गरज नाही. अर्थातच मराठी भाषेला ऊर्जितावस्था यावी यासाठी शासन स्तरावर तसेच जनसामान्यांकडून अधिक प्रयत्नांची गरज आहे.
” सम्यक तनोति इति संतान” या दृष्टीने माय मराठीच्या रक्षणासाठी तिच्या सर्व लेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टी करता येतील. जसे संवादाची भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर अधिकाधिक करता येईल. वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमात मराठीतील पुस्तके भेट म्हणून देता येतील . विविध ठिकाणी वाचनालये सुरू करता येतील. मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मराठी भाषा विकासासाठी विविध पुरस्कार व अनुदाने उपलब्ध होत असतात याबाबतची माहिती देता येईल . विविध साहित्यिकांनाही वैयक्तिक हेवे-दावे व राजकारण बाजूला सारत मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी योगदान देणे आवश्यक आहे. समाजातील सर्व घटक माय मराठीच्या उत्थानासाठी पुढे सरसावले पाहिजे. आपणा सर्वांच्या सकारात्मक प्रयत्नांनी माय मराठीला नक्कीच सोन्याचे दिवस येतील यात शंका नाही. असे केले तरच आपल्यालाही संजीवनी मराठे यांच्या निम्नलिखीत ओळी अभिमानाने म्हणता येतील
” माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी ,तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.”

कु. कीर्तीमला श्रीकृष्ण राऊत
आरास लेआउट ,बुलढाणा.
फोन नं.८८३०९४९१८१

Previous articleजिल्हयात मंगळवारी 17 कोरोना पॉझिटिव्ह, 53 जणांना डिस्चार्ज
Next articleअकोला परिमंडळातील एस.टी.कर्मचारी संपावर ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here