चंद्रपूर, दि. 22 : “सर्वांसाठी घरे” या देशगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, बल्लारपूर विधानसभेतील घरकुल लाभार्थ्यांना वेळेत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी वाळूचा वेळेवर पुरवठा अत्यावश्यक असून, यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ कृती करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व उपविभागीय अधिकारी मुल व चंद्रपूर,तहसीलदार, गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वाळूचा अवैध उपसा होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी शक्य असल्यास आजच वाळू /रेती घाटाची तपासणी करावी.तालुक्यातील किती घरकुलांना वाळू देण्यात येणार आहे, त्या घरकुलांची संख्या व करण्यात येणाऱ्या वाळू वाटपाची माहिती अद्यावत करावी. घरकूल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू लागणार आहेत त्यांची आवश्यक कागदपत्रांची यादी तयार करावी. घरकूल लाभार्थ्यांची नाव व मोबाईल क्रमांकांची यादी तयार करावी.
प्रत्येक तालुक्यामध्ये वाळू/रेती वाटपासाठी वाळू काउंटर सुरु करावेत. घरकुल लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांच्याशी संवाद साधावा. वाळू वाटप होणाऱ्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करावा. गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल साठी आवश्यक वाळू /रेतीची मागणी तहसीलदार यांच्याकडे नोंदवावी. ज्यांनी अद्याप वाळू साठी अर्ज केले नाही, त्यांनी अर्ज करावा. तसेच ज्या घाटाचे लिलाव झाले आहेत. त्यामधूनही घरकुल लाभार्थ्यांना रेती देणे शक्य आहे. घरकुल लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी तालुकानिहाय 5 सदस्यांची समिती स्थापन करावी. तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीय कार्य समजून हे कार्य सेवाभावाने पार पाडावे असेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
विशेषतः, प्रत्येक घरकुल लाभार्थ्यास 5 ब्रास वाळू /रेती मोफत देण्यात येणार आहे.
चंद्रपूर तालुक्यामध्ये 3,100 मंजूर घरकुल लाभार्थी असून अजयपुर, पिंपळखुट, चेक निंबाळा, शिवनी चोर, वढा, बेलसनी, घुगुस (हल्याघाट) आणि मारडा असे एकूण 8 रेती/वाळू घाट निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये 7,534 ब्रास वाळू /रेतीसाठा उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात 1,183 लाभार्थ्यांना वाळू वाटपाचे नियोजन आहे.
पोंभूर्णा तालुक्यामध्ये एकूण वाळू ची मागणी 3645 असून 18 हजार 225 ब्रास वाळूची उपलब्धता आहे. याकरिता 10 वाळू /रेती घाट निश्चित करण्यात आले असून अंदाजीत 12,528 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुल तालुक्यातील 4 महसूल मंडळातील 5 वाळू /रेतीघाटांमध्ये 9,610 ब्रास वाळू साठा उपलब्ध आहे. ई-टीपी जनरेट करण्याचं काम सुरू आहे.
बल्लारपूर तालुक्यामध्ये 1,500 मंजूर घरकुल लाभार्थी आहे. 3,575 ब्रास वाळू उपलब्ध असून 7,500 ब्रास वाळू/रेतीची मागणी आहे. याकरिता 5 वाळू घाट निश्चित करण्यात आले आहे.