मूल (जिल्हा चंद्रपूर) – कोविड-19 महामारीपूर्वी नियमित थांबा असलेल्या सुपरफास्ट रेल्वेगाड्यांचा थांबा (स्टॉप) मूल-मारोडा रेल्वे स्थानकावर पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी मूल येथील नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश रगडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांना याबाबत निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोविडपूर्व काळात चेन्नई एक्सप्रेस, कोरबा–यशवंतपूर, या सुपरफास्ट गाड्यांना मूल-मारोडा स्थानकावर नियमित थांबा होता. मात्र, कोरोना काळात या गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले आणि अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक जनतेच्या वतीने केलेल्या या मागणीस पाठिंबा देत, दिनेश रगडे यांनी सांगितले की, “मूल हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे. येथे रेल्वे थांबा असणे अत्यंत गरजेचे असून, यामुळे नागरिकांना प्रवासात दिलासा मिळेल आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल.”
या मागणीसाठी मूल शहरातील अनेक नागरिकांनी एकत्र येत सह्या करून निवेदनाला आपला पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने लवकरात लवकर ही मागणी मान्य करून थांबे पुनःस्थापित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





