मुल (जि. चंद्रपूर)
मुल तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रात स्थित कार्निवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या इथेनॉल उत्पादक कंपनीत शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव रसिक रमेश गेडाम (रा. राजगड) असे असून तो कंपनीत मजूर म्हणून कार्यरत होता.
सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील ठेकेदार राजेंद्र यांच्या आदेशानुसार रसिकला मशीन बंद करण्याचे काम देण्यात आले होते. काम करत असताना त्याचा शर्ट मशीनमध्ये अडकला. शर्ट काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा हात मशीनमध्ये अडकला आणि तो गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत कंपनी प्रशासनाने त्याला तातडीने मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोस्टमार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्याच्यावर राजगड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, संबंधित यंत्रणांनी याची चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.