मूल:- वीज बिल भरणे, नवीन जोडणी व तक्रारींसाठी येणाऱ्या ग्राहकांना मूल येथील महावितरण म्हणजेच MSEB कार्यालयात वेळेवर सेवा न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, कामानिमित्त आलेल्या ग्राहकांना तासनतास बसून ठेवण्यात आले. चौकशी केली असता “लिंक फेल आहे, सर्व्हर चालू नाही” असे कारण वारंवार सांगण्यात आले. मात्र कार्यालयातील एका हॉलमध्ये असलेले तीन कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असल्याचे व एकमेकांकडे बघून हसत असल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले, असा आरोप त्यांनी केला. या ३ कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप असल्याची चर्चाही ग्राहकांमध्ये आहे.
काम न करता मोबाईलवर वेळ घालवणे व खोटी कारणं सांगून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप ग्राहकांनी केल्यानंतर त्यांच्यात नाराजी पसरली. शासकीय कार्यालयात ग्राहकसेवेऐवजी अशी हेळसांड होत असल्याने वीज ग्राहकांमध्ये असंतोषाची भावना आहे.
*शिस्तभंगाची कारवाई करू : उपकार्यकारी अभियंता तुराणकर* विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी आपसात चर्चा करण्यात गुंग राहात असल्याची तोंडी तक्रार मला प्राप्त झाली त्यानुसार मी चौकशी करून दोषी आढळणारा कर्मचाऱ्यांवर शिस्तभागाची कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुलचे उपकार्यकारी अभियंता तुराणकर यांनी प्रतिक्रिया दिली.





