मूल, प्रतिनिधी
पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर मूल पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिस स्टेशन मूल आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय पंचायत समिती मूल यांच्या संयुक्त पथकाने कोरंबी गावातील एका शेतकऱ्याच्या गोदामावर छापा टाकून 8 हजार 830 रुपये किमतीचा बोगस HTBT कापूस बियाणे साठा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 14/06/2025 रोजी सायंकाळी 6:30 ते 7:00 वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. कोरंबी येथील शंकर सोमाजी धुपरी, वय 42 वर्षे, यांच्या गोदामात अवैधरित्या HTBT कापूस बियाणे ठेवण्यात आल्याचे उघड झाले.
या बियाण्यांवर उत्पादकाचे नाव, लॉट नंबर, लेबल नंबर, तपासणी दिनांक, वैधता दिनांक, GEAC मान्यता क्रमांक व प्रत्येक पॅकेटवर दर मुद्रित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हे बियाणे बेकायदेशीर असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी शंकर धुपरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंदुलाल राठोड हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. इंदुलाल राठोड, पोहवा. गणेश मेश्राम, महिला राठोड व कृषी अधिकारी मनीषा राजनहेरे यांच्या पथकाने केली.





