मूल:- शहरातील प्रभाग क्रमांक 10, शासकीय गोडाऊन परिसरात 10 जून रोजी दुपारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाचा आज पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी दुपारी 3 वाजता शासकीय गोडाऊन परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले होते. या मारहाणीत 42 वर्षीय मारोती मेश्राम गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर प्रथम मूल उपजिल्हा रुग्णालयात, नंतर चंद्रपूर येथे आणि त्यानंतर नागपूर येथील एम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर प्रभाग 10 मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, काल रात्री प्रभाग 10 मध्येच दोन युवकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली. भांडण सोडविण्यासाठी गेलेले स्थानिक नगरसेवक राहुल प्रेमलवार यांचा डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांनी प्रभागात, विशेषतः रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
प्रभाग क्र.10 परिसरातील रहिवासी होते. स्वभावाने शांत आणि मृदू असल्याने परिसरात सर्वांशी चांगले संबंध होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. कुटुंबावर आलेल्या या अचानक दुःखातून सावरणे कठीण आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करत आहेत. पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.





