Thursday, September 17, 2026
Home मूल ‘स्मृतिगंध’मधून उमटला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा सुगंध”

‘स्मृतिगंध’मधून उमटला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा सुगंध”

0
92

मूल : शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल च्या ‘स्मृतिगंध २०२५–२६’ या वार्षिकांकाचे विमोचन अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, साहित्यिक व सर्जनशील अभिव्यक्तीला तसेच महाविद्यालयीन वर्षभरातील विविध उपक्रमांना शब्दबद्ध करणारा ‘स्मृतिगंध’ हा वार्षिकांक म्हणजे महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षणांचा जिवंत दस्तऐवज .

कार्यक्रमाची सुरवात वंदे मातरम व विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्षिकांकाच्या प्रकाशिका व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अनिता वाळके यांनी मांडले. त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी ‘स्मृतिगंध’च्या निर्मितीमागील संकल्पना स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, “महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा एका सुंदर आठवणीचा भाग असतो. वर्षभरात घडणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक आणि विविध उपक्रमांचे प्रतिबिंब ‘स्मृतिगंध’मध्ये जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वतःची अभिव्यक्ती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. ‘स्मृतिगंध’ विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय ठेवा ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. ए. रॉय, गोविंदप्रभू महाविद्यालय, तळोधी यांच्या व सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘स्मृतिगंध २०२५–२६’ चे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. उपेंद्र चिटमलवार, मराठी विभागप्रमुख, यादवराव पोशेट्टीवार महाविद्यालय, तळोधी, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शशिकांतजी धर्माधिकारी सर, सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ मूल . तसेच वार्षिकांकाच्या प्रकाशक व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके, संपादक डॉ. संदीप मांडवगडे, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. लोमेश देशमुख मंचावर उपस्थित होते. उद्घाटक डॉ. ए. रॉय यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना सांगितले की, महाविद्यालयीन वार्षिकांक हा केवळ वर्षभरातील घटनांचा संग्रह नसून विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला दिशा देणारा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. ‘स्मृतिगंध’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुंदर मेळ साधला असल्याचे त्यांनी नमूद केले.“आजच्या डिजिटल युगात क्षणभंगुर आठवणींना कायमस्वरूपी शब्दरूप देण्याचे काम अशा वार्षिकांकातून होते. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि सर्जनशीलतेची परंपरा अधिक समृद्ध करावी,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.प्रमुख अतिथी डॉ. उपेंद्र चिटमलवार यांनी ‘स्मृतिगंध’मधील साहित्यिक अभिव्यक्तीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षणाबरोबरच साहित्य, कला आणि संस्कृतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लेखनामुळे विचारांना आकार मिळतो आणि विचारशील विद्यार्थीच समाजाच्या भविष्यासाठी सक्षम नेतृत्व देऊ शकतात.

‘स्मृतिगंध’ हा विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा, प्रतिभेचा आणि महाविद्यालयीन संस्कारांचा आरसा आहे. हा वार्षिकांक विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शशिकांतजी धर्माधिकारी सर यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होय. त्यांनी अनेक गमतीदार व घटीत घटनांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला आणि प्रतिभेला अभिव्यक्ती देणारा ‘स्मृतिगंध’ हा त्या संस्कार प्रक्रियेचा सुंदर परिणाम आहे. हे प्रतिपादित केले.

विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलता जोपासावी. ‘स्मृतिगंध’ची परंपरा भविष्यातही अधिक समृद्ध होत राहो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा त्यांनी दिल्या. सरतेशेवटी डॉ संदीप मांडवगडे यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लोमेश देशमुख यांनी केले व या कार्यक्रमाला सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Previous articleभारती राखडे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप
Next articleसाईबाबा मंदिर बाजार समिती मूल तर्फे शेतकऱ्यांना बैलपोळा भेट; प्रत्येक बैलजोडीधारकाला शेती अवजार भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

© All Rights Reserved